रावणवाडी हत्या प्रकरणात पोलिसांच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह
खऱ्या आरोपींना पाठीशी घालत असल्याचा परिजनांचा आरोप; उच्चस्तरीय चौकशीची मागणी
गोंदिया :- तालुक्यातील रावणवाडी येथे दिनांक 20 मे रोजी मध्यरात्री घडलेल्या ढाबाचालक राजकुमार हरीणखेडे यांच्या हत्या प्रकरणाने आता नवे वळण घेतले आहे. या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेला महेश प्रकाश नेवारे हा खरा आरोपी नसून, या घटनेमागील मुख्य सूत्रधारांना जाणीवपूर्वक वाचविण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप मृतकाच्या परिजनांनी व गावकऱ्यांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर संतप्त परिजन व गावकरी मोठ्या संख्येने रावणवाडी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले. त्यांनी पोलिसांच्या तपास पद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत निष्पक्ष चौकशीची मागणी केली. परिजनांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी जनतेची दिशाभूल करत घाईघाईने एका व्यक्तीला आरोपी म्हणून अटक केली असून, वास्तविक आरोपींना पाठीशी घालण्याचे काम सुरू आहे.
मृतकाच्या कुटुंबीयांनी आरोप केला की, घटनास्थळी करण्यात आलेला पंचनामा योग्य पद्धतीने करण्यात आलेला नाही. तसेच तपासादरम्यान गोळा करण्यात आलेले काही पुरावे संशयास्पद असून ते बनावट असल्याचाही आरोप त्यांनी केला. “खऱ्या आरोपींना वाचवण्यासाठी बोगस आरोपी पुढे करण्यात आला आहे,” असा आरोप फिर्यादी पक्षाने केला आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे रावणवाडी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संतापाची भावना दिसून येत आहे. गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, जर निष्पक्ष व सखोल चौकशी झाली नाही तर पीडित कुटुंबाला न्याय मिळणार नाही. त्यामुळे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी समितीमार्फत तपास करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
दरम्यान, या प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालून तपासाची पारदर्शकता सुनिश्चित करावी, तसेच सर्व संबंधित पुराव्यांची वैज्ञानिक तपासणी करून खऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे.
रावणवाडी येथील या हत्या प्रकरणाने संपूर्ण परिसर हादरला असून आता पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
