मुरमाडी येथे अवैध देशी दारू वाहतूक उघड; मोटारसायकलसह ₹50 हजारांहून अधिकचा मुद्देमाल जप्त
आठवडाभरातील दुसरी धडक कारवाई; अवैध मद्यव्यवसायाविरोधात दिघोरी पोलिसांचा दणका
मुरमाडी | प्रतिनिधी :- दिघोरी पोलीस ठाण्याच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे चिचाळ–मुरमाडी मार्गावर सापळा रचून अवैध देशी दारूची वाहतूक करणाऱ्या एका व्यक्तीवर कारवाई केली. या कारवाईत देशी दारूच्या बाटल्या व वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली मोटारसायकल असा ₹50,880 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे, आठवडाभरातील ही दुसरी मोठी कारवाई असल्याने अवैध मद्यव्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 3 जुलै 2026 रोजी सकाळी 9.10 ते 9.45 वाजताच्या दरम्यान चिचाळ–मुरमाडी डांबरी मार्गावर पंचांसमक्ष सापळा रचण्यात आला. या कारवाईत भोजराज अंताराम ढोक (वय 40, रा. मुरमाडी, ता. लाखांदूर, जि. भंडारा) याला ताब्यात घेण्यात आले.
आरोपीच्या ताब्यातील हिरो होंडा स्प्लेंडर (क्र. MH-40/E-9848) या दुचाकीवरून 90 मिली क्षमतेच्या टायगर ब्रँड देशी दारूच्या 22 भरलेल्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. जप्त दारूची किंमत ₹880, तर मोटारसायकलची किंमत ₹50,000 असून, एकूण ₹50,880 किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
या प्रकरणी पोलीस शिपाई शेखर बनकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा क्र. 150/2026 अंतर्गत आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65(अ) व 65(इ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याची नोंद दुपारी 12.45 वाजता करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस हवालदार घनश्याम कोडापे करीत आहेत.
दिघोरी पोलिसांनी अवैध मद्यसाठा व वाहतुकीविरोधातील मोहीम अधिक तीव्र केली असून, अशा बेकायदेशीर व्यवसायावर यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा दिला आहे. आठवडाभरात सलग दुसऱ्यांदा झालेल्या या कारवाईमुळे अवैध मद्यव्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
