General

शेतात काम करत असलेल्या शेतकऱ्यावर रानडुकराचा हल्ला; गंभीर जखमी

तिरोडा : – तालुक्यातील धादरी-उमरी येथे शेतात काम करत असलेल्या एका शेतकऱ्यावर रानडुकराने अचानक हल्ला केल्याची घटना 20 जुलै रोजी दुपारी सुमारे 3 वाजताच्या सुमारास घडली. या हल्ल्यात रामकृष्ण आबाजी कापसे (रा. धादरी-उमरी) हे गंभीर जखमी झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, रामकृष्ण कापसे हे आपल्या शेतात नियमित शेतीची कामे करत असताना अचानक रानडुकराने त्यांच्यावर झडप घातली. अनपेक्षित झालेल्या या हल्ल्यात त्यांच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या. त्यांच्या आरडाओरडीनंतर परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत रानडुकराला पिटाळून लावले आणि जखमी कापसे यांना तातडीने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, तिरोडा येथे दाखल केले.

उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींच्या शरीरावर खोल जखमा असून त्यांच्यावर टाके घालण्यात आले आहेत. त्यांची प्रकृती सध्या वैद्यकीय देखरेखीखाली असून पुढील उपचार सुरू आहेत.

या घटनेमुळे धादरी-उमरी परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाळ्याच्या दिवसांत रानडुकरे शेतांमध्ये अन्नाच्या शोधात येत असल्याने अशा घटना वाढत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. वन विभागाने या भागात गस्त वाढवून रानडुकरांचा बंदोबस्त करावा तसेच शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.