प्रभात टॉकीज चौकात तासन्तास पडून राहिलेल्या व्यक्तीकडे दुर्लक्ष; मानवतेसह यंत्रणेवर प्रश्नचिन्ह
गोंदिया, प्रतिनिधी : – गोंदिया शहरात दिवसेंदिवस वाहतुकीची वर्दळ वाढत असताना सार्वजनिक ठिकाणी घडणाऱ्या घटनांकडे संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. दिनांक 20 जुलै रोजी भर दुपारी प्रभात टॉकीज चौकात एक व्यक्ती रस्त्याच्या कडेला खाली कोसळलेल्या अवस्थेत पडून होती. विशेष म्हणजे ती व्यक्ती तासन्तास त्याच ठिकाणी पडून असूनही पोलीस किंवा संबंधित यंत्रणेतील कोणत्याही अधिकारी-कर्मचाऱ्याने त्याची दखल घेतली नसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
शहरातील अत्यंत वर्दळीच्या चौकात ही घटना घडूनही वेळेवर मदत न मिळाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. एखादी व्यक्ती आजारी पडली होती, अपघातग्रस्त होती की अन्य कोणत्या कारणामुळे खाली कोसळली होती, याची खातरजमा करण्याचाही प्रयत्न संबंधित यंत्रणेकडून झाला नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
या घटनेमुळे मानवी संवेदनशीलता आणि प्रशासनाच्या तत्परतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मानवाधिकारांचे संरक्षण, आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तातडीने मदत आणि सार्वजनिक सुरक्षिततेची जबाबदारी नेमकी कोणाची, असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत. आधुनिकतेच्या आणि स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या शहरात एखादी व्यक्ती तासन्तास मदतीच्या प्रतीक्षेत पडून राहते, ही बाब चिंताजनक असल्याचे मत सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.
घटनेनंतर संबंधित विभागाने अशा प्रकारच्या घटनांची गंभीर दखल घेऊन तातडीने प्रतिसाद देण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारावी, तसेच सार्वजनिक ठिकाणी गस्त आणि आपत्कालीन मदत व्यवस्थेला अधिक सक्षम करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.
