General

जिल्ह्यात भीषण अपघात : दोन महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या तरुणाचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी..!

 

 

गोंदिया : दिनांक 16 एप्रिल रोजी रात्री सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास माहलगाव मुरदडा ते धापेवाडा मार्गावर भीषण रस्ता अपघात घडला. या अपघातात नवविवाहित तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून त्याची पत्नी गंभीर जखमी झाली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, तवेरा गाडी (क्रमांक MH-20 AS-8376) चालकाने भरधाव वेगात वाहन चालवित असताना समोरून येणाऱ्या दुचाकी (क्रमांक MH-35 AZ-6571) ला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकी चालक निलेश पेंढारकर केवट (वय 27 वर्षे, रा. एमआयडीसी मुंडीपार) यांचा मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी तनू निलेश केवट (वय 27 वर्षे) गंभीर जखमी झाली आहे.

विशेष म्हणजे, या दाम्पत्याचा केवळ दोन महिन्यांपूर्वी, 16 फेब्रुवारी रोजी विवाह झाला होता. नातेवाईकांकडे जाण्यासाठी ते दोघे प्रवास करत असताना हा दुर्दैवी अपघात घडला. या घटनेमुळे कुटुंबीयांसह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

 

घटनेची माहिती मिळताच दवनेवाडा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र, उपस्थित नागरिकांनी 108 ॲम्ब्युलन्स सेवेला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. शेवटी पोलिसांनीच मृतक व जखमीला आपल्या वाहनातून केटीएस सामान्य रुग्णालय, गोंदिया येथे हलविले.

 

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर जवळपास अर्धा तास जखमी निलेश घटनास्थळी तडफडत होते. वेळीच वैद्यकीय मदत मिळाली असती, तर त्यांचा जीव वाचू शकला असता, रस्त्यावरून प्रवास करत असताना असणाऱ्या एखाद्या चार चाकी ने मदत केली असती तर कदाचित मृतक निलेश चे प्राण वाचू शकले असते, अशावेळी माणूस या नात्याने ती संवेदनशीलता जपणे अत्यंत आवश्यक आहे. नागरिकांनी याविषयी अत्यंत सजगपणे कोणतीही भीती न ठेवता पीडितास तात्काळ मदत करणे अपेक्षित आहे. पण असे घडू शकले नाही त्याचे दुःखही आहे.

अशा घटनांविषयी जनतेच्या मनात अजूनही संभ्रम असल्यामुळे अशावेळी अपेक्षित असलेली मदत जनसामान्यांकडून होताना दिसत नाहीये तेव्हा अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आपली यंत्रणा प्रचार प्रसारात कमी पडते आहे का याच्या शोध घेणे अत्यंत गरजेचे आहे.

या घटनेची नोंद घेत दवणेवाडा पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून पुढील तपास पीएसआय किररे करत आहेत.

दरम्यान, वाढत्या रस्ते अपघातांमुळे निष्पाप नागरिकांचे जीव जात असून कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळत आहे. या घटनेने पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण केला आहे.