16 वर्षांपासून नक्षलभत्ता व घरभाडे भत्त्याची प्रतीक्षा; निवृत्त विस्तार अधिकाऱ्याची प्रशासनाकडे न्यायाची मागणी
राजू फुंडे/सालेकासा प्रतिनिधी ,:- पंचायत समिती सालेकासा येथे सन 2002 ते 2009 या कालावधीत विस्तार अधिकारी (कृषी) पदावर कार्यरत असलेल्या नीलकंठ माहुले यांना सेवाकाळातील नक्षलभत्ता व घरभाडे भत्ता अद्यापही प्राप्त झाला नसल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणाला तब्बल 16 वर्षांहून अधिक काळ लोटला असतानाही संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने त्यांनी प्रशासनाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सालेकासा परिसर नक्षलग्रस्त क्षेत्र म्हणून ओळखला जात असल्याने त्या काळात कार्यरत कर्मचाऱ्यांना शासनाच्या नियमानुसार विविध भत्त्यांचा लाभ देण्यात येत होता. मात्र विस्तार अधिकारी म्हणून सेवा बजावलेल्या नीलकंठ माहुले यांना त्यांच्या सेवाकाळातील नक्षलभत्ता व घरभाडे भत्त्याची थकबाकी अद्याप मिळालेली नाही. त्या काळात सेवानिवृत्त झालेल्या इतर पदाधिकाऱ्यांना न्यायालयाने दिलेल्या आदेशान्वये सरसकट लाभ मिळाला आहे
या संदर्भात त्यांनी अनेक वेळा पंचायत समिती तसेच संबंधित वरिष्ठ कार्यालयांकडे पत्रव्यवहार करून आपल्या प्रलंबित रकमेची मागणी केली. मात्र वारंवार पाठपुरावा करूनही त्यांच्या मागणीची दखल घेतली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. निवृत्तीनंतरच्या दैनंदिन गरजा आणि वाढत्या आर्थिक अडचणी लक्षात घेता थकीत रक्कम मिळणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
“प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे”
टीम अवेकिंग न्यूजशी बोलताना नीलकंठ माहुले यांनी सांगितले की, या प्रकरणाकडे संबंधित खंडविकास अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या पाठपुराव्यानंतरही कोणताही सकारात्मक निर्णय होत नसल्याने त्यांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाच्या या उदासीन भूमिकेमुळे शासकीय यंत्रणेवरील विश्वास कमी होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
त्यांनी पुढे सांगितले की, शासनाच्या नियमांनुसार मिळणारे भत्ते हे कर्मचाऱ्यांचा हक्क असून त्यासाठी इतकी वर्षे प्रतीक्षा करावी लागणे दुर्दैवी आहे. संबंधित विभागाने प्रकरणाची तातडीने दखल घेऊन आवश्यक पडताळणी पूर्ण करत थकीत रक्कम अदा करावी, अशी त्यांची मागणी आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपाची अपेक्षा
या प्रकरणात होत असलेला विलंब आणि प्रशासनाकडून दिसणारी उदासीनता लक्षात घेता जिल्हा प्रशासन व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून प्रकरण निकाली काढावे, अशी मागणी नीलकंठ माहुले यांनी केली आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या आर्थिक देयकांबाबत न्याय मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, निवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित देयकांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, संबंधित विभाग या प्रकरणावर काय भूमिका घेतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
