General

रजेगावचा पाणीपुरवठा चार दिवसांपासून ठप्प; नागरिकांमध्ये संताप, प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

गोंदिया :- 

भीषण उष्णतेच्या काळात रजेगाव येथील पाणीपुरवठा मागील चार दिवसांपासून पूर्णपणे ठप्प झाल्याने ग्रामस्थांना मोठ्या हालअपेष्टांना सामोरे जावे लागत आहे. एका खाजगी कामादरम्यान गावातील मुख्य पाणीपुरवठा पाईपलाईन तुटल्याने ही समस्या निर्माण झाली असून, घटनेला चार दिवस उलटूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गावात सुरू असलेल्या एका खाजगी कामाच्या वेळी पाणीपुरवठ्याची मुख्य पाईपलाईन तुटली. त्यामुळे गावातील सुरळीत सुरू असलेला पाणीपुरवठा पूर्णपणे बंद पडला. परिणामी अडीच हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या रजेगावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागत आहे. कडक उन्हामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली असून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे.

ग्रामीण भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी शासनाच्या विविध योजना कार्यान्वित आहेत. तसेच अशा आपत्कालीन परिस्थितीत तातडीने उपाययोजना करून नागरिकांना पाणी उपलब्ध करून देण्याचे निर्देश शासनस्तरावरून वेळोवेळी दिले जातात. मात्र रजेगावमध्ये चार दिवस उलटूनही पर्यायी पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यात आलेली नसल्याने ग्रामपंचायत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

दरम्यान, गावातील विविध समस्यांवर सातत्याने भूमिका घेणारा विरोधी पक्षही या गंभीर प्रश्नावर शांत असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे. नागरिकांना भेडसावणाऱ्या या मूलभूत समस्येकडे विरोधकांनीही दुर्लक्ष केल्याचा आरोप काही ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

गावात आधीपासूनच विविध नागरी समस्यांचे प्रश्न प्रलंबित असताना पाणीपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. याशिवाय गावात पूर्णवेळ ग्रामसेवक अथवा जबाबदार अधिकारी नसून प्रभारी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून कारभार सुरू असल्याने अनेक कामांवर परिणाम होत असल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

रजेगावसारख्या मोठ्या लोकसंख्या असलेल्या गावासाठी पूर्णवेळ अधिकारी नियुक्त करून पाणीपुरवठ्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे. प्रशासनाने या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देऊन नागरिकांना दिलासा देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.