आंदोलन

अड्याळ परिसरात उदंड झाले ‘बॅनर बहाद्दर’;महिला संघटन व ग्रामस्थ आक्रमक!

RTI चा धाक दाखवून ब्लॅकमेलिंग आणि कमिशनबाजीचा नवा धंदा; संतप्त गावकऱ्यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा

अमित रणदिवे /भंडारा ;- “उदंड झाले सामाजिक कार्यकर्ते, बॅनर बहाद्दर! आता लीडर पाहिजे आपला नीडर!” हा खमंग संवाद सध्या अड्याळ परिसरात चांगलाच चर्चिला जात आहे. समाजकारणाचा मुखवटा घालून फिरणाऱ्या काही भोंदू कार्यकर्त्यांविरुद्ध आता जनतेचा संयम सुटला असून, ग्रामस्थांचा संताप उफाळून आला आहे. माहिती अधिकाराचा (RTI) हत्यार म्हणून वापर करत अधिकाऱ्यांना धमकावणे, वृत्तपत्रात बातम्या देण्याची भीती दाखवून कंत्राटदारांकडून जाडजूड कमिशन लाटणे आणि प्रशासकीय कामांची ठेकेदारी मिळविणे हाच या काही ‘बॅनर बहाद्दर’ सामाजिक कार्यकर्त्यांचा मुख्य धंदा बनल्याचा खळबळजनक आरोप आता उघडपणे होऊ लागला आहे.

सर्वसामान्य जनतेच्या न्याय-हक्कासाठी लढण्याचे ढोंग करणाऱ्या सामाजिक, राजकीय व धार्मिक संघटनांमधील काही कार्यकर्त्यांचे आता चक्क ‘वसुलीचे केंद्र’ आणि स्वतःची उपजीविका चालविण्याचे साधन बनल्याचा धक्कादायक आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

ग्रामसभेला दांडी, सोशल मीडियावर मात्र ‘गंभीर’ चिंता!

चौकाचौकांत आणि बसस्थानकावर स्वतःचे मोठे बॅनर्स लावून स्वतःचे उदात्तीकरण करण्यात हे तथाकथित नेते मग्न असतात. देशाची आणि गावाची गंभीर चिंता असल्यागत चहाच्या टपऱ्यांवर चर्चा करणारे व व्हॉट्सॲप-फेसबुकवर दिवसाला ५०-५० मेसेज टाकून स्वस्त प्रसिद्धी मिळवणारे हे नेते प्रत्यक्ष मात्र ग्रामपंचायतीच्या अत्यंत महत्त्वाच्या अशा ‘ग्रामसभेत’ कधीही फिरकत नाहीत.

गावात सध्या प्रशासन आणि या स्वयंघोषित , सामाजिक कार्यकर्ते आणि पुढाऱ्यांमध्ये ‘५०:५०’ टक्केवारीचे साटेलोटे सुरू असल्याची चर्चा आहे. केवळ स्वतःचा खिसा गरम करण्याच्या या उद्योगामुळे शासकीय कामांचा दर्जा प्रचंड खालावला असून, गावाची अवस्था बिकट झाल्याचे चित्र अड्याळ परिसरातील गावागावांत पाहायला मिळत आहे.

उत्सवांच्या नावाखाली सक्तीची वर्गणी

विविध सण आणि उत्सवांचे निमित्त साधून स्थानिक व्यापारी प्रतिष्ठान, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, बार, देशी दारू भट्टी,अवैध व्यवसाय करणारे आणि सामान्य जनतेकडून सक्तीने वर्गणी गोळा करणे आणि कर्णकर्कश मोठ्या आवाजाचे डीजे आणणे, एवढाच काय तो यांचा मर्यादित कार्यक्रम उरल्याचा टोला गावकऱ्यांनी लगावला आहे.

तंटामुक्ती समिती की स्वार्थ कारणांचे साधन?

ग्रामसभेत दारूबंदी व इतरही अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी ठराव मंजूर करूनही, गावात एकीकडे अवैध धंदे उघडपणे सुरू आहेत. असे असताना गावाची ‘तंटामुक्ती समिती’ मात्र मूग गिळून बसली आहे. ही समिती तंट्याचा निपटारा करण्यासाठी आहे की तंटा वाढविण्यासाठी? असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. यातील काही पदाधिकारी आपल्या पदाचा गैरवापर करून स्वतःचा इन्शुरन्स किंवा इतर वैयक्तिक व्यवसाय चमकवत असल्याचा गंभीर आरोप गावातील महिला वर्गाने केला आहे.

तीव्र जनआंदोलनाचा इशारा

प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून सुरू असलेला हा भोंदू कारभार आता मोडीत काढण्याचा निर्धार अड्याळच्या जनतेने, विशेषतः महिला संघटनेने केला आहे. या ब्लॅकमेलिंग करणाऱ्या टोळीवर वरिष्ठ प्रशासन काय कायदेशीर पावले उचलते, याकडे संपूर्ण भंडारा जिल्ह्याचे लक्ष लागले असून, तातडीने कारवाई न झाल्यास महिला संघटन आणि गावकऱ्यांनी तीव्र जनआंदोलनाचा इशारा दिला आहे.