“त्या… ‘पार्सल’ खंडणीखोराचा टीव्ही चॅनेलच्या आडोशाने पुन्हा ‘धंदा’ सुरूच..?
२०१९ मधील खंडणी प्रकरणातील संशयित सध्याच्या एका TV चॅनल चा प्रतिनिधी…..!
भंडारा : – पत्रकारितेच्या पवित्र क्षेत्राला स्वतःच्या फायद्यासाठी ब्लॅकमेलिंगचे माध्यम बनवणाऱ्या काही परजिल्ह्यातील प्रवृत्तींमुळे संपूर्ण क्षेत्राची प्रतिमा मलीन होत आहे. सन २०१९ मध्ये भंडारा पंचायत समितीच्या एका अधिकाऱ्याकडून १ लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला परजिल्ह्यातील एक पत्रकार सध्या एका मोठ्या आणि नामांकित टीव्ही न्यूज चॅनेलचा प्रतिनिधी म्हणून मिरवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे प्रकरण सध्या न्यायालयात प्रलंबित असतानाही, स्वतःचा गुन्हेगारी इतिहास लपवून हा ‘पार्सल’ पत्रकार पुन्हा एकदा शासकीय वर्तुळात सक्रिय झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
असे होते सण २०१९ मधील प्रकरण
जुलै २०१९ मध्ये भंडारा येथील पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील एका कनिष्ठ प्रशासन अधिकाऱ्याला वैद्यकीय व रजेची बिले पास करण्याच्या नावावरून धमकावण्यात आले होते. लाचखोरीचा खोटा आरोप लावून ‘बातमी न लावण्यासाठी’ तब्बल १ लाख रुपयांची थेट खंडणी मागण्यात आली होती. या प्रकरणी पीडित अधिकाऱ्याने दाखवलेल्या धैर्यामुळे भंडारा पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३८५ अन्वये रीतसर गुन्हा नोंदवण्यात आला होता. या प्रकरणी पुढे कायदेशीर कारवाई होऊन हे प्रकरण सद्यस्थितीत न्यायालयीन प्रक्रियेत आहे.
“त्या, पार्सल पत्रकाराला बड्या चॅनेलचे ‘कवच’
गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायालयीन खटला सुरू असतानाही, परजिल्ह्यातून आलेल्या याने राजकीय व आर्थिक वजन वापरून एका मोठ्या टीव्ही चॅनेलच्या मोठ्या नावाचा आडोसा घेऊन हा पत्रकार आता पुन्हा एकदा जिल्ह्यातील शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच कंत्राटदारांवर दबाव टाकण्याचा आणि जुना इतिहास दाबण्याचा प्रयत्न करीत असल्याच्या तक्रारी दबक्या आवाजात ऐकायला मिळत आहेत. स्वतःवर खंडणीचा खटला सुरू असताना ही व्यक्ती लोकांना कोणत्या नैतिकतेचे डोस पाजते? असा उद्विग्न सवाल आता उपस्थित केला जात आहे.
अधिकाऱ्यांनो सावधान! खंडणीखोरांला असे ओळखा…
कोणताही पत्रकार जर तुम्हाला बातमीची भीती दाखवून पैशांची किंवा इतर कोणत्याही फायद्याची मागणी करत असेल, तर तो पत्रकार नसून ‘खंडणीखोर’ आहे. परजिल्ह्यातून येऊन केवळ गळ्यात बड्या चॅनेलचे ओळखपत्र टांगले म्हणजे तो धुतल्या तांदळाचा होत नाही. संबंधित व्यक्तीचा पूर्वइतिहास तसेच चॅनेलचे अधिकृत नियुक्तीपत्र तपासण्याचा अधिकार प्रत्येक जबाबदार नागरिकाला आणि अधिकाऱ्याला आहे. २०१९ मधील प्रकरणात भंडारा पंचायत समितीच्या अधिकाऱ्याने दाखवलेले धैर्य प्रत्येकाने दाखवणे गरजेचे आहे. खंडणीखोरांच्या दबावाला बळी पडण्याऐवजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग किंवा स्थानिक पोलीस ठाण्यात तात्काळ रीतसर तक्रार नोंदवा.
