General

जिल्हा परिषदेत पदोन्नती प्रक्रियेचा बोजवारा!अंतिम यादी रखडली; व्हॉट्सॲपवर बोलावून विषय शिक्षक कार्यशाळा

गोंदिया (वार्ताहर):- 

गोंदिया जिल्ह्यात शिक्षकांच्या पदोन्नतीचा आणि पदस्थापनेचा विषय चांगलाच तापला आहे. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे आणि काही स्वघोषित सेवाज्येष्ठ शिक्षकांच्या हस्तक्षेपामुळे गोंदियातील पारदर्शक प्रक्रियेला गालबोट लागले असून, शिक्षक वर्गात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

नेमकी ‘माशी शिंकली’ कुठे?

गोंदिया जिल्ह्यात ०१ सप्टेंबर २०२५ रोजी TET पात्र असलेल्या शिक्षकांची पदोन्नती यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. यादी प्रसिद्ध झाल्याने पदोन्नतीची प्रक्रिया मार्गी लागेल अशी आशा शिक्षकांना होती. मात्र, अचानक या प्रक्रियेत कुठे माशी शिंकली हे कोणालाच समजले नाही. 15 ते 20 दिवस उलटून गेले तरी, आजपर्यंत या प्रक्रियेची अंतिम यादीच प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. गोंदिया जिल्हा परिषदेत शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांची 23 पैकी 19 पदे, केंद्रप्रमुखांची 8 पदे व उच्च श्रेणी मुख्याध्यापक chi 60 पदे रिक्त असून सुद्धा प्रशासन सदर पदोन्नती कार्यशाळा थांबवून ठेवलेली आहे.

शासकीय आदेशांना केराची टोपली आणि ‘व्हॉट्सॲप’ कारभार

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, शासनाच्या १४ मे च्या पत्राच्या आणि उच्च न्यायालयाच्या निर्देशांच्या थेट विरोधात जाऊन गोंदियात ‘विषय शिक्षक कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली. आश्चर्य म्हणजे, या महत्त्वाच्या कार्यशाळेसाठी शिक्षणाधिकाऱ्यांनी कोणतेही अधिकृत पत्र काढले नाही. केवळ ‘व्हॉट्सॲप’ संदेशाद्वारे शिक्षकांना कार्यशाळेसाठी पाचारण करण्यात आले. हा प्रशासकीय नियमांचा उघड उघड भंग असल्याची चर्चा शिक्षण वर्तुळात आहे.

झुंडशाहीपुढे प्रशासन हतबल?

काही स्वघोषित सेवाज्येष्ठ शिक्षकांच्या झुंडशाहीपुढे नियम व कायद्याचे राज्य मागे पडले आहे का? असा उद्विग्न सवाल आता सामान्य शिक्षक विचारू लागले आहेत.

पारदर्शकतेचा अभाव: – अधिकृत पत्रांऐवजी व्हॉट्सॲपवर चालणारा कारभार प्रशासनाची उदासीनता आणि मनमानी दर्शवतो.

 तातडीने कारवाईची मागणी: –  या संपूर्ण प्रक्रियेची वरिष्ठ पातळीवरून चौकशी व्हावी आणि रखडलेली अंतिम यादी त्वरित पारदर्शक पद्धतीने जाहीर करावी, अशी मागणी शिक्षकांकडून होत आहे.