सामाजिक

1987 बॅचच्या निवृत्त पोलिस अंमलदारांचा स्नेहमेळावा; गुरुजनांचा सन्मान

गोंदिया, प्रतिनिधी : महाराष्ट्र पोलीस दलात 12 जुलै 1987 रोजी तत्कालीन भंडारा-गोंदिया जिल्ह्यात रुजू झालेल्या पोलिस अंमलदारांचा निवृत्तीनंतरचा स्नेहमेळावा लाखनी येथील एप्पल हॉटेलमध्ये 12 जुलै रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. जवळपास चार दशकांच्या सेवेनंतर पुन्हा एकत्र आलेल्या सहकाऱ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत मैत्रीचे बंध अधिक दृढ केले.

या मिलन सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे उपस्थितांनी आपल्या जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमात पटले सर, ठवरे सर, बारसागडे सर आणि खोटेले सर यांचा शाल व श्रीफळ देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी शिक्षकांनी दिलेल्या संस्कार, शिस्त आणि मूल्याधारित शिक्षणामुळेच पोलीस सेवेत प्रामाणिकपणे कार्य करता आले, अशा भावना व्यक्त केल्या.

निवृत्त पोलिस अंमलदारांनी सेवाकाळातील अनेक संस्मरणीय अनुभव, आव्हाने आणि यशस्वी कामगिरीच्या आठवणींना उजाळा दिला. सहकाऱ्यांमधील आत्मीयता, परस्पर सहकार्य आणि समाजसेवेची भावना आजही कायम असल्याचे या स्नेहमेळाव्यात दिसून आले.

कार्यक्रमाचे आयोजन अरविंद काणेकर (भंडारा), वैरागडे मेजर (भंडारा) तसेच गोपाल कापगते (गोंदिया) यांनी केले. उपस्थितांनी आयोजकांचे कौतुक करत अशा स्नेहमेळाव्यांमुळे जुन्या सहकाऱ्यांमध्ये संवाद वाढतो, अनुभवांची देवाणघेवाण होते आणि सामाजिक बांधिलकी अधिक दृढ होते, असे मत व्यक्त केले.

भावनिक वातावरणात पार पडलेल्या या मिलन सोहळ्याने सेवाभाव, गुरुजनांप्रती आदर आणि सहकाऱ्यांमधील मैत्रीचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. उपस्थितांनी भविष्यातही अशा स्नेहसंमेलनांचे नियमित आयोजन करण्याचा निर्धार व्यक्त केला.