General

अड्याळला तालुक्याचा दर्जा केव्हा मिळणार? दोन दशकांचा वनवास अद्याप कायम!

आधी तालुका की नगरपंचायत? नागरिकांमध्ये संभ्रम;

अमित रणदिवे भंडारा प्रतिनिधि:- भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील सर्वात मोठे, भौगोलिक व व्यापारी दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे केंद्र असलेले ‘अड्याळ’ गाव गेल्या २० वर्षांपासून पूर्णवेळ तालुक्याच्या दर्जासाठी प्रतीक्षा करत आहे. दोन दशकांपासून अड्याळ ग्रामवासियांच्या हक्काच्या निवेदनाची फाईल मंत्रालयात धूळखात पडली असून, निवडणूक आली की जाहीरनाम्यांच्या माध्यमातून राजकीय नेत्यांकडून आश्वासनांची पोकळ ‘पुंगी’ वाजवली जाते. मात्र, निवडणूक संपताच या आश्वासनांचा भ्रमाचा भोपळा फुटतो, असा थेट आरोप आता येथील जनसामान्य नागरिक करत आहेत.

२०१९ चे तीव्र आंदोलन आणि मुख्यमंत्र्यांचे आश्वासन अड्याळला तालुका घोषित करण्या संदर्भात २०१९ च्या लोकसभा निवडणुकी दरम्यान अड्याळ ग्रामवासियांनी आक्रमक पाऊल उचलत निवडणुकीवर थेट ‘बहिष्कार’ टाकला होता आणि तीव्र आंदोलन छेडले होते. या आंदोलनादरम्यान आठ आंदोलनकर्त्या ग्रामवासियांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले होते. त्यानंतर दोन आयुक्त आणि चार जिल्हाधिकाऱ्यांना अड्याळ वासियांनी अहवाल सादर केला होता.दरम्यान, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात जेव्हा नवीन जिल्हे व तालुक्यांची पुनर्रचना करण्यात येईल, तेव्हा अड्याळला प्राधान्याने तालुक्याचा दर्जा दिला जाईल, असे आश्वासन सुद्धा दिले होते. मुख्यमंत्र्यांच्या या आश्वासनावर विश्वास ठेवून ग्रामवासियांनी आपले आंदोलन मागे घेतले होते. मात्र, त्यानंतर पूर्णवेळ तालुक्याचा दर्जा देण्याऐवजी केवळ ‘अप्पर तालुका’ घोषित करण्याचे सोंग कशासाठी रचले गेले? असा पेच नागरिकांना पडला आहे. केवळ अप्पर तालुका आणि नगरपंचायतीचे राजकारण करून नेत्यांनी जनतेच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे, अशी संतप्त भावना परिसरात व्यक्त केली जात आहे.

आधी लगीन कोंढाण्याचे की रायबाचे?’ नागरिकांमध्ये संभ्रम” आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी अड्याळ नगरपंचायत घोषित होणार असल्याचा दावा केला होता. परंतु, अड्याळ येथीलच काही स्वार्थी राजकारण्यांच्या पोटात दुखत असल्यामुळे व नगरपंचायत होऊ नये म्हणून त्यांनी कटकारस्थान रचून ती फाईल समोर सरकू दिली नाही, असा आरोप केला गेला आहे. या राजकीय गाजर देण्याच्या कुरघोडीत आणि श्रेयवादाच्या लढाईमुळे आता नागरिकांमध्ये “आधी तालुका की नगरपंचायत? आधी लगीन कोंढाण्याचे की रायबाचे?” असा मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

ऐतिहासिक, व्यापारी आणि धार्मिक महत्त्व           राजकारण्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाणाऱ्या व भंडारा-चंद्रपूर महामार्गावर असलेल्या अड्याळ हे माजी राज्यमंत्री विलासराव शृंगारपवार यांचे गाव असून, संपूर्ण विदर्भाचे श्रद्धास्थान व जागृत देवस्थान असलेल्या ‘हनुमंत राया’च्या नावाने या तीर्थक्षेत्राची ओळख आहे. भोसलेकालीन इतिहासाची पार्श्वभूमी असलेल्या या गावात दरवर्षी आयोजित होणाऱ्या प्रसिद्ध ‘घोडायात्रेनिमित्त’ अख्या विदर्भातून लाखांवर भाविक दर्शनासाठी येतात. मात्र, इतके महत्त्व असूनही आज “अर्धा विकास बाकी भकास” असे विदारक चित्र येथे पाहायला मिळत आहे.

“अड्याळची प्रशासकीय व भौगोलिक सद्यस्थिती:                ८० गावांचा भार सांभाळणारे इंग्रजकालीन पोलीस स्टेशन, ५० खाटांचे ग्रामीण रुग्णालय व इतर शासकीय व निमशासकीय कार्यालय आणि भंडारा जिल्ह्यातील सर्वात मोठी १७ सदस्य संख्या असलेली ग्रामपंचायत. तसेच परिसरातील विद्यार्थ्यांसाठी मुख्य शैक्षणिक केंद्र आहे.तसेच येथील नायब तहसीलदार कार्यालय शोभेची वास्तू ठरल्यामुळे शेतकरी, अपंग, वृद्ध, विधवा महिला, विद्यार्थी आणि पालकवर्गाला आपल्या लहान-सहान कार्यालयीन कामांसाठी २० ते ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या तालुक्याच्या ठिकाणी पवनी येथे जावे लागते. यामध्ये नागरिकांना मोठा आर्थिक व मानसिक मनस्ताप सोसावा लागतो. अड्याळ हे भौगोलिकदृष्ट्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने याला तालुक्याचा दर्जा मिळाल्यास परिसरातील हजारो ग्रामस्थांची मोठी सोय होणार आहे.

रोजगारासाठी तरुणांचे स्थलांतर.                          अड्याळच्या तालुका निर्मितीच्या मार्गात सातत्याने नवनवीन तांत्रिक अडचणी उभ्या केल्या जात आहेत. तालुक्याचा पूर्णवेळ दर्जा न मिळाल्यामुळे या भागात कोणतेही मोठे उद्योग, कारखाने किंवा नवीन शासकीय कार्यालये येऊ शकलेली नाहीत. परिणामी, पायाभूत सुविधांच्या अभावामुळे स्थानिक बेरोजगार युवक-युवतींना रोजगारासाठी शहरांकडे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करावे लागत आहे. स्थानिक लहान-मोठ्या व्यावसायिकांचे व्यवसाय डबघाईस आले असून, महिलांचे गृहउद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. मुला-मुलींचे उच्च शिक्षण आणि रोजच्या उदरनिर्वाहाच्या विवचनेत जनसामान्य कुटुंब सापडले आहे. जर अड्याळ तालुका घोषित झाले, तर विविध कार्यालयीन कामांसाठी रोज लोकांची ये-जा राहील, ज्यामुळे स्थानिक पातळीवर शेकडो लहान व्यावसायिक आणि सर्वसामान्यांना हक्काचा रोजगार उपलब्ध होऊ शकतो. मात्र, सध्या “अड्याळ वासियांच्या चुलीवरच्या घुगऱ्या चुलीवरच आंबल्या…” अशी अत्यंत दयनीय आणि संतापजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.

जनआंदोलनाचा थेट इशारा: ‘सिंघम’ कोण बनणार?नगरपंचायतीचे गाजर देऊन आणि अप्पर तालुक्याचे राजकारण करून भोळ्या-भाबळ्या जनतेला मूर्ख बनवण्याचे उद्योग आता थांबले पाहिजेत,” अशी थेट मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. स्वार्थकारणासाठी कटकारस्थान न करता, विरोधी आणि सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येऊन सर्वसामान्यांच्या नाकी नऊ आणणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी निस्वार्थपणे पुढे यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. आता या जळजळीत प्रश्नावर जनतेला न्याय देण्यासाठी कोण ‘सिंघम’ बनणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मी पुन्हा येईन’ म्हणणाऱ्यांच्या आणि पोकळ आश्वासने देणाऱ्यांच्या विरोधात आता सर्वसामान्य नागरिकांनी रस्त्यावर उतरण्याची तयारी सुरू केली असून, गल्लीबोळात या आंदोलनाचीच चर्चा रंगू लागली आहे. “शासनाने तात्काळ अड्याळ पूर्णवेळ तालुका व तहसील कार्यालयाबाबत ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा आम्ही पुन्हा एकदा तीव्र लोकचळवळ उभारून रस्त्यावर उतरू,” असा जाहीर आणि थेट इशारा अड्याळ व परिसरातील संतप्त नागरिकांसह, महिला व विद्यार्थ्यांनी प्रशासनाला दिला आहे.