गणखैरा येथे फार्म हाऊसचे गेट कोसळून महिलेचा जागीच मृत्यू?
गोंदिया : – शहरालगत असलेल्या गणखैरा परिसरातील शुभ्रा देवी फार्म हाऊस येथे लोखंडी गेट कोसळल्याने एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवार, 10 ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या दुर्घटनेत रितू ललित कटरे (वय 37, रा. पूरगाव) यांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, रितू कटरे या कामानिमित्त शुभ्रा देवी फार्म हाऊस येथे गेल्या होत्या. काम आटोपल्यानंतर सायंकाळी सुमारे सहा वाजताच्या दरम्यान त्या परतीच्या तयारीत होत्या. फार्म हाऊसचे गेट बंद करून निघण्याच्या तयारीत असतानाच अचानक गेट त्यांच्या अंगावर कोसळले.
अचानक घडलेल्या या दुर्घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या. मात्र घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, रितू कटरे यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर गोंदिया ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनेची नोंद करून मृतदेह ताब्यात घेतला असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या घटनेमागील नेमके कारण तसेच गेटची स्थिती आणि त्याच्या कोसळण्यास कारणीभूत ठरलेली परिस्थिती याबाबत पोलिसांकडून तपास केला जात आहे.
शहराच्या अगदी लगत असलेल्या परिसरात ही घटना घडल्याने फार्म हाऊस आणि खासगी ठिकाणी उभारण्यात आलेल्या मोठ्या लोखंडी गेटच्या सुरक्षिततेचा प्रश्नही या निमित्ताने ऐरणीवर आला आहे. गेटची योग्य देखभाल आणि सुरक्षिततेची तपासणी वेळोवेळी केली जाते का, याचीही चौकशी होणे गरजेचे आहे.
दरम्यान, या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत असून, एका क्षणात घडलेल्या दुर्घटनेत एका महिलेचा जीव गेल्याने कटरे कुटुंबावर दुःखाचे सावट पसरले आहे.
